लातूर - जिल्ह्यातील औसा येथे आठ मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज बीडमधील एका युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नसल्याचे त्याने म्हटले आहे. त्यानंतर, आता औसा येथील तहसिल कार्यालयात मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. काकासाहेब शिंदे या तरुणाच्या जलसमाधीपासून या आंदोलनाची धार अधिकच तीव्र झाली. त्यानंतर, राज्यात मराठा आंदोलकांकडून आत्महत्येचा प्रयत्न सुरुच आहे. आज लातूर जिल्ह्याच्या औसा तहसिल कार्यालयात 8 आंदोलकांनी एकत्रपणे आत्मदहनाचा प्रयत्न केला. औसा तालुक्यातील टाका येथील महेश शिंदे, राजकिरण साठे, चैतन्य गोरे, रविकांत पाटील, जगदीश शिंदे, शिवाजी सावंत, विलास शिंदे, अजित शिंदे या आठ युवकांनी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेतले. यावेळी पोलिसांनी तात्काळ या तरूणांना रोखून ताब्यात घेतले़. त्यानंतर तब्बल दीड तास तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करुन सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, त्याकरिता प्रशासन पाठपुरावा करील असे लेखीपत्र दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, युवक, विध्यार्थी, सकल मराठा बांधव उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आठ दिवसांपूर्वी मागण्यांचे निवेदन दिले होते़ त्यावर कारवाई न झाल्याने मंगळवारी आंदोलन करण्यात आले़
आॅगस्ट क्रांती दिनी आंदोलनतहसीलदारांच्या कॅबीनमध्ये तब्बल दीड तास चाललेल्या आंदोलनानंतर औसा विश्रामगृहात सकल मराठा समाज बांधवांची बैठक झाली़ यावेळी ९ आॅगस्ट क्रांती दिनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यात तालुक्यातील प्रत्येक सर्कलच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून तालुक्याच्या ठिकाणी जवळपासच्या गावांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले़
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यातील अभिजित देशमुख (वय 35 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेली ही सातवी आत्महत्या आहे. अभिजित देशमुख यांनी मंगळवारी (31 जुलै) सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. त्यांच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणाने आत्महत्या करत आहे, असे लिहिल्याचे आढळले आहे. दरम्यान, संबंधित चिठ्ठी त्यांनीच लिहिली आहे का?, याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सांगितले. विज्ञान विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होते. त्यांच्यासह कुटुंबीयांवर बँकेचे कर्जही होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याची बाब त्यानं मित्रांकडे व्यक्त केली होती. शिवाय, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता.