लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर तालुक्यातील मांजरा पट्टा म्हणून ओळख असलेल्या ३० गावात पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथच समाजबांधवांनी घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी गादवड येथे मागील १८ दिवसांपासून साखळी उपोषण आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जोपर्यंत राज्य सरकार आरक्षण देणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका गादवड येथील समाजबांधवांनी घेतली आहे. तसेच परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यकर्ते भेटी घेत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आता शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तत्काळ आरक्षण लागू करावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गावोगावी जाऊन समाजातील नागरिकांना एकत्र करून आरक्षणाची गरज लक्षात आणून दिली जात आहे.
या गावांनी घेतली सामुहिक शपथ...
लातूर तालुक्यातील गादवड, तांदुळजा, वांजरखेडा, पिंपळगाव, भोसा, पिंपरी, कानडी बोरगाव, टाकळगाव, सारसा, बोडका, जोडजवळा आदी ३० गावांनी आपापल्या ग्रामदैवताची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता गावांमध्ये राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
अशी घेतली जात आहे शपथ....मी माझ्या ग्रामदैवताची शपथ घेतो की, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात येऊ नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा माझा निश्चय असणार आहे.