लातूर : मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८५ लाखांवर आहे. त्याआधारे आपल्या भागात आणखी ६५० बँका स्थापित केल्या जाऊ शकतात. जनतेला अधिकाधिक बँकिंग सेवेचा लाभ मिळावा, शासकीय योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी बँकांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी येथे केले.
लातूर येथील कार्निव्हलच्या सभागृहात मराठवाड्यातील बँकांची ‘मराठवाडा आर्थिक मंथन’ बैठक घेतली. यावेळी डॉ. कराड बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. मुद्रा योजनेतून १० लाखांपर्यंत कर्ज देता येईल. मागास प्रवर्गातील उमेदवारांना इंडिया स्टार्टअप् योजनेतून वित्त पुरवठा करण्यात येत आहे. त्याचाही लाभ बँकांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जनधन व मुद्रा योजनेची व्याप्ती करण्यात येत आहे.
बैठकीस मराठवाड्यातील बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच उस्मानाबादचे खा. ओम राजेनिंबाळकर, नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने आयोजित मराठवाडा आर्थिक मंथन कार्यक्रमाद्वारे मराठवाड्यातील बँकांचे जाळे मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. याशिवाय, एटीएमची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांना बँकेचे कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी, बँका उघडताना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली.