नांदेड- राज्यात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी महाविकास आघाडी, नंतर शिवसेनेतील बंडखोरी अन् आता राष्ट्रवादीतील फोडाफोडी ही सर्वसामान्य मतदारांची शुद्ध फसवणुक आहे.
राजकर्त्यांनी आमच्या मतांचा बाजार मांडला असून आमचा मतदानाचा हक्क शासनाने परत घ्यावा या मागणीसाठी तरुणांनी बोटाला चूना लावून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले.निवेदनानुसार, आम्ही प्रत्येक निवडणुकीत उत्साहात मतदान करतो. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मंडळींनी आमच्या मतांची चेष्टा मांडली आहे. आम्ही २०१९ मध्ये एकदा मतदान केले. परंतु सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे. काल महाराष्ट्रात परत एक शपथविधी झाला. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असून लोकशाहीचा खून करणारा आहे. हे सर्व पाहून लोकशाहीवरील आमचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे लोकशाहीने आम्हाला दिलेला मतांचा अधिकार शासनाने परत घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी महेंद्र देमगुंडे, शंकर स्वामी, अरुण धुतराज, गजानन सरोदे, हनमंत पटणे, माधव स्वामी, प्रकाश केटीग, दिलीप कळसकर, श्रीराम पटाईत यांची उपस्थिती होती.