लातूर - भारतात घूसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीचा लातुरातील तरूणीशी लग्न करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. त्याच्यासह अन्य एका बांगलादेशीला अटक केली असून संबधित तरूणीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कबीर रजाउल्ला उर्फ शादुल्ला (२६), मोहंमद मुरानवत हुसेन दिनार (२२ दोघेही रा. जि. चिटूरग्राम, बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.हे दोघे दहा ते बारा वर्षांपूर्वी देशाची सीमा ओलांडून भारतात दाखल झाले होते. सध्या त्यांचा मुक्काम मुंबईतील अंधेरी आणि साकीनाका परिसरात होता. यातील कबीरची लातूरनजिकच्या कोळपा येथील एका तरूणीशी फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून ती घनिष्ट झाली. सोशल मीडियातून संपर्कात असलेल्या कबीरने या मुलीशी विवाह करण्यासाठी थेट लातूर गाठले. कोळपा येथील आपल्या वृद्ध आईकडे राहणाºया मुलीच्या घरी या दोघांनी गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम ठोकला होता. लग्न करण्याच्या इराद्याने ते लातूरच्या दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात शनिवारी आले. यावेळी एटीएस आणि महिला दक्षता समितीच्या पथकाने सापळा रचून या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांची रविवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यांच्याकडे असलेले आधारकार्ड, पॅनकार्ड, दोन मोबाईल आणि दोन सीमकार्ड असा मुद्देमाल जप्त केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे ते भारतात वास्तव्याला होते. याबाबत मुलीसह या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. चौकशीअंती विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कबीर शेख, मोहंमद दिनार या दोघा बांगलादेशीविरोधात गु.र.नं. ११७/२०१८ कलम ३ सह ६ पारपत्र (भारतामध्ये प्रवेश नियम १९५०), ३ (१) परकीय नागरिक अधिनियम १९४८, सहकलम १४ परकीय नागरी कायदा १९४६, सहकलम १४ (अ) परकीय नागरिक सुधारणा कायदा २००४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. के.वाय. तोरणे हे करीत आहेत.
बांगलादेशी घुसखोराचा लग्नाचा डाव लातूर पोलिसांनी उधळला, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:58 AM