ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 18 - लातूर- बार्शी रस्त्यावरील साखरा पाटी शिवारात असलेल्या हिरेमठ पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास तिघांनी टाकलेल्या सशस्त्र दरोड्यातील मास्टरमार्इंड प्रभुलिंग लखादिवे याच्यासह प्रदीप लिंबाजी ओगले, सचिन संभाजी कावळे यांच्या मुसक्या पोलीस पथकाने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक रिव्हॉल्वर, चार जिवंत काडतुसे, रोख 40 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरोड्यातील मास्टरमार्इंड हा पाखरसांगवी येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे.
साखरा पाटी शिवारातील लातूर-बार्शी राज्यमार्गालगत असलेल्या हिरेमठ पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री तिघांनी सशस्त्र दरोडा टाकत एक अंगठी, लॉकेट आणि रोख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली होती. या घटनेने लातूरसह जिल्हाभरात खळबळ उडाली होती. घटनेतील घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून पोलिसांनी आपली तपासाची चक्रे गतिमान केली. शरीरयष्टी आणि घटनेत वापरलेले कपडे, सँडल, बूट आदी साहित्यावरून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.
महागडे बूट, कपडे वापरणारा आणि अशी शरीरयष्टी असलेल्या व्यक्तीचा शोध लागला आणि पोलीस पथकाने पाखरसांगवी गाठली. पाखरसांगवीतील जाणकार नागरिकांशी चर्चा केल्यानंतर संशय अधिक बळावला. त्याबाबतची चौकशीही करण्यात आली. मास्टरमार्इंड तथा पाखरसांगवी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष प्रभूलिंग लखादिवे हा सकाळपासूनच गायब होता. तो अंबाजोगाई येथील नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. पोलिसांनी अंबाजोगाई गाठत त्याला हेरले. त्यानंतर तो लातूरच्या दिशेने निघाला.
त्यापाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याचा पाठलाग करीत लातूरजवळ आले. लातूरजवळील नवीन रेणापूर नाका येथे त्याच्यावर झडप टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. अधिक चौकशीनंतर त्याने इतर साथीदारांचीही नावे सांगितली. यामध्ये मोटारसायकल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असलेले प्रदीप लिंबाजी ओगले, सचिन संभाजी कावळे यांनाही तातडीने पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून रोख 40 हजार रुपये, लॉकेट, एक पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपींची नावे जाहीर केली.
दरोड्याचा साथीदारासोबत रचला होता कट
४ पाखरसांगवी येथील प्लॉटिंगच्या व्यवसायात नाव असलेल्या आणि तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असलेल्या प्रभूलिंग लखादिवे याने पूर्वाश्रमीच्या आपल्या व्यवसायातील साथीदारावरच दरोडा टाकण्याचा कट रचला. यासाठी गेल्या महिनाभरापासून त्याने साथीदारांची चाचपणी केली होती. मोटारसायकल चोरीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या प्रदीप ओगले, सचिन कावळे याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या तिघांनी एकत्रित येऊन सशस्त्र दरोडा टाकण्याचा कट रचला. दरोडा टाकतेवेळी गोळी झाडायची नाही, असेही ठरले होते. रिव्हॉल्वरचा फक्त धाक दाखविण्यासाठी उपयोग व्हावा, अशी तंबीही प्रभूलिंग लखादिवे याने आपल्या साथीदारांना दिली होती. त्यातूनच पेट्रोलपंप चालक श्रीकांत हिरेमठ यांच्यावर केवळ बंदूक रोखण्यात आली. दहशत पसरविण्यासाठी काचेवर गोळी झाडली गेली.