उदगीर : मागील आठवड्यापासून केंद्र सरकारने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. उदगीरात आता पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त, तर डिझेल ९१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या दरवाढीचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी, ट्रॅक्टरने शेती मशागती कामांच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, आता खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता दिल्यानंतर सोमवारी बियाणे- खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर रासायनिक खतांच्या किमती वाढविल्या आहेत. १०:२६:२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली, तर डीएफएची किंमत ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएफए पूर्वी ११८५ रुपयांना मिळत होते. आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०:२६:२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ ऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहेत. पोटॅशच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.
उदगीर तालुक्यात जवळपास ६६ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. मागील वर्षी ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, १३ हजार ६०० हेक्टरवर तूर, ३ हजार हेक्टरवर संकरित ज्वारी, १ हजार ६०० हेक्टरवर उडीद, तर २ हजार हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. सोयाबीनच्या राशीवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या सोयाबीनच्या दरात वाढ झाली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या. सध्या बाजारात सोयाबीनचा दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला आहे.
मागील वर्षीचे बहुतांश शेतकऱ्यांकडे पेरणीयोग्य स्वतःचे बियाणे शिल्लक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांची खरेदी करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारपासून काही प्रमाणात सवलत दिल्याने तसेच पावसाळा जवळ आल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयासमोर रांग लावत आहेत. मे महिना संपण्यास आणखीन १५ दिवस शिल्लक असले तरी यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्ताविल्याने शेतकऱ्यांना बियाणांसाठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
बियाणांची शेतकऱ्यांकडून चौकशी...
काेरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होते. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. आता जिल्हा प्रशासनाने काही सवलत दिली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन बियाणांची चौकशी करीत आहेत; परंतु कंपनीकडून बियाणे येण्यास वेळ लागत आहे, असे बियाणे विक्रेते सतीश जवळगे यांनी सांगितले.