लातूर : जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर झालेल्या परीक्षांमधून ३० विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळुरू येथे सहलीसाठी निवड करण्यात आली असून, मंगळवार, १६ मे रोजी हे विद्यार्थी सहलीसाठी रवाना होणार आहेत.
जिल्ह्यात शाळास्तरावर झालेल्या परीक्षेला ३२ हजार ९४० विद्यार्थी सामोरे गेले होते. यात प्रत्येक तालुक्यातील तीन, अशा एकूण ३० जणांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था व परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यासाठी निवड झाली आहे. १६ मे रोजी ३० विद्यार्थी, शिक्षण विभागातील पाच अधिकारी आणि पाच शिक्षक, असे एकूण ४० जण विमानाने रवाना होणार असून, २० मे रोजी लातूरला परत येणार आहेत. या सहलीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था, तसेच परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ब्लेझर, शूजसह हवाई सफरीचा खर्च जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात येणार आहे. दरम्यान, या सहलीसाठी इच्छुक शिक्षकांची संख्या अधिक असल्याने त्यांचीही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पाच शिक्षकांचीही सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.
३२ हजार विद्यार्थ्यांतून ३० जणांची निवड...विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये शाळास्तरावर ३२ हजार ९४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तसेच केंद्र स्तरावर ५०६६, तालुकास्तरावर १ हजार २० आणि जिल्हास्तरावर श्रीकिशन सोमाणी विद्यालयात १० मार्च रोजी झालेल्या परीक्षेला १०० विद्यार्थी सामोरे गेले. यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण घेणारे तीन विद्यार्थी हवाई सफरीसाठी निवडण्यात आले आहेत. जि.प.च्या सेस फंडातून या सहलीसाठी खर्च करण्यात येणार असून, सीईओ अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते २० मे या कालावधीत सहलीचे नियोजन करण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले.इस्रो सहलीसाठी १६ मे चा मुहूर्त; ३० विद्यार्थ्यांना घडणार हवाईसफर