जळकोट : तालुक्यातील चेरा येथील जवान शादूल निजाम शेख (वय ३५) यांचे उपचारादरम्यान आसाम राज्यातील तेजपूर येथील सैन्य रुग्णालयात रविवारी सायंकाळी निधन झाले होते. मंगळवारी सकाळी मूळगावी चेरा येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी शासकीय इतमामात पार पडला. यावेळी पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. ‘शहीद जवान शादूल शेख अमर रहे’ च्या घोषणांनी त्यांना शाेकाकुल वातावरणात अखेरचा निराेप देण्यात आला.
जळकोट तालुक्यातील चेरा येथील जवान शादूल शेख हे आसाम राज्यातील तेजपूर येथे सैन्य दलात कार्यरत होते. अचानक आजारी पडल्याने त्यांच्यावर तेजपूर येथील सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी तेजपूर येथून हैदराबाद येथे त्यांचे पार्थिव विमानाने आणण्यात आले होते. तेथून मंगळवारी सकाळी सैन्य दलाच्या वाहनाने त्यांचे पार्थिव चेरा येथे आणल्यानंतर शाळेच्या मैदानावर दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता मुस्लिम कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी पाठविलेला शाेकसंदेश वाचून दाखविला.
त्यानंतर माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. सुधाकर भालेराव, उपनगराध्यक्ष मन्मथप्पा किडे, राजेंद्र केंद्रे, सभापती विठ्ठल चव्हाण, मेहताब बेग, खादर लाटवाले, सोमेश्वर सोप्पा, गजानन पाटील दळवे, अर्जुन पाटील आगलावे, बाबूराव जाधव, सज्जनकुमार लोनावळे, दिलीप कांबळे, सरपंच मुकुंद पाटील, संजय माने, पेशइमाम सय्यद चांद मुल्ला, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भारतीय सैन्य दलातील बालाजी फड, शब्बीर मोहम्मद साब, अवंत फड, श्रीसागर, हवालदार कांबळे, विठ्ठल भोर, कॅप्टन दत्ता नामवाड आदींसह विविध गावांतील नागरिक उपस्थित होते.
कुटुंबीयांना फोडला हंबरडा...जवान शादूल शेख यांचे पार्थिव चेरा गावात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अंत्यदर्शनासाठी हिंदू-मुस्लिम समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील शालेय विद्यार्थ्यांनीही तिरंगा रॅली काढून शादूल शेख अमर रहे घोषणा दिल्या. शहीद जवान शादूल शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, चार वर्षांचा मुलगा, सहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे.