लातूर : सराईत दराेडेखाेरांच्या टाेळीतील सहाजणांवर लातूर पाेलिसांनी माेक्का लावला आहे. लातूर पाेलिस दलाच्यावतीने माेक्कांतर्गत केलेली ही तिसरी कारवाई आहे. या कारवाईने दराेडेखाेर, गुन्हेगारांच्या टाेळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, १५ मे २०२३ रोजी लातुरातील नवीन रेणापूर नाका परिसरात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची माहिती पेट्रोलिंगवरील पोलिसांना समजली होती. दरम्यान, त्यावेळी स्थागुशा आणि लातुरातील सर्व ठाण्याचे प्रमुख, कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांचा सिनेस्टाइल पाठलाग करत पाचजणांना मुद्देमालासह अटक केली. गुन्ह्याचा तपास करताना लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी, तर राज्यात विविध ठिकाणी दराेडेखाेरांनी सशस्त्र दरोडे टाकले आहेत. या टाेळीच्या विराेधात दरोडा, चोरीचे अनेक गुन्हे विविध पाेलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती समोर आली.
अधिक चाैकशी केली असता, गुन्ह्यांचा उलगडा झाला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, गांधी चौक आणि विवेकानंद चौक ठाणे तसेच राज्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टाेळीने सशस्त्र दरोडे टाकले. अटकेत असलेल्या महेश आसाराम चव्हाण (रा. गेवराई), नितीन संजय काळे ऊर्फ बापू टांग्या काळे (रा. अहमदनगर), विकास रामभाऊ भोसले (रा. बीड), रवींद्र संजय काळे (रा. अहमदनगर), लक्ष्मण पांडुरंग भोसले (३० रा. उमापूर, ता. गेवराई, जि. बीड) हा फरार असून, सहावा आराेपी अल्पवयीन आहे. त्यांच्याविराेधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर डीवायएसपी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दरोडेखोरांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ माेक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी स्थागुशाचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, विवेकानंद ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, विधी सल्लागार ॲड. सारिका वायबसे, संतोष खांडेकर, पांडुरंग सगरे यांच्या पथकाने केली.