एकमेकांशी संवाद साधल्याने मन हलके होते. तसेच त्यातून आनंदही मिळत असतो. त्यामुळे जीवनात उत्साह राहत असतो. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे अनेकजण घरातच बसून आहेत. घराचत बसून राहिल्याने संवाद कमी झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यातच संवाद नसल्याने एकटेपणामुळे नैराश्य, स्मृतीभ्रंश, चिंता वाढली आहे. तरुण वर्गामध्ये संवादाअभावी डिप्रेशन वाढले आहे. शिवाय, एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनाच्या आहारी जात आहेत. सर्व व्यक्ती घरातच राहत असल्याने महिलांना घरातील काम वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येही चिडचिडेपणा वाढत आहे. लहान मुलांचेही वजन वाढले आहे. त्यातच ऑनलाइनमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी, डोळ्यांच्या समस्या जाणवत आल्याचे चित्र आहे.
संवाद साधणे हाच उपाय...
कोरोना काळात अनेक जण घरात राहिले. त्यामुळे मैत्र, मैत्रिणी, नातेवाईक, समाजाशी संवाद कमी झाला. त्यामुळे नैराश्य वाढले.
संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मोबाइलवरून संपर्क साधून संवाद साधला जात आहे. मात्र, समोरा समोर बोलल्याने जे मन हलकं होते त्या प्रकारे मन हलकं होत नाही.
मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्यातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
मानवी जीवनात संवाद हा महत्त्वाचा आहे. सध्या मोबाइलमुळे प्रत्येकाचे वेगळे जग निर्माण झाले आहे. एकमेकांसोबतचा सहवास अति झाल्यास त्याच्या सध्या अडचणी येतात. दिवसभराचे वेळापत्रक ठरवून प्रत्येक घटकासाठी वेळ दिल्यास मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यास मदत होते. ऐकणे, बोलणे, प्रतिक्रिया देणे हा संवादाचा मुख्य घटक आहे. शरीर, मन, कुटुंब, काम, समाज या पाचही गोष्टींना वेळ देणेही गरजेचे आहे. सोबतच चांगले छंद जोपासणे, आहार याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या गोष्टींचे अवलोकन केल्यास मानसिक स्वास्थ निरोगी ठेवण्यास मदत होते. - डॉ. मिलिंद पोतदार, लातूर