लातूर : विविध स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या जिल्हा परिषद शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून बंगळुरूची सफर घडविण्यात येणार असून, यासाठी शाळांमधील १३ मुली आणि १२ मुलांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता हे विद्यार्थी रेल्वेने रवाना होणार असून, बंगळुरू शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत.
समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शिक्षण घेत असलेल्या २५ विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता हे विद्यार्थी लातूर रेल्वेस्टेशन येथून बंगळुरूसाठी रवाना होणार आहेत. यामध्ये विविध प्रेक्षणीय स्थळे, क्युबन गार्डन, शासकीय संग्रहालय, टीपू पॅलेस, जवाहरलाल नेहरू प्लनेटेरियम, हेरिटेज सेंटर व ऐरोस्पेस म्युझियम, लालबाग बॉटनिकल गार्डन, टेंपल आदी स्थळांना भेट देणार आहे. या शैक्षणिक सहलीचा सर्व खर्च जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानद्वारे करण्यात येणार आहे. बंगळुरू येथे दोन दिवस मुक्काम करून विद्यार्थी व सोबतचे शिक्षक २४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता लातूरकडे रवाना होणार आहेत. या सहलीसाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे तर उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार हे पथकप्रमुख राहणार आहेत.
बंगळुरू शहरात या स्थळांना भेटी देणार...जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत विविध उपक्रमांत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांची सहलीसाठी निवड केली आहे. शाळासिद्धी उपक्रमात अ गटातील शाळा, दोन ते तीन वर्षांत प्रगत गटात असलेल्या शाळांतील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २१ मार्च रोजी सहल रेल्वेद्वारे रवाना होणार असून, २४ मार्च रोजी लातूरकडे निघणार आहे. या सहलीमध्ये बंगळुरू शहरातील विविध प्रेक्षणीय स्थळे, क्युबन गार्डन, शासकीय संग्रहालय, टीपू पॅलेस, जवाहरलाल नेहरू प्लनेटेरियम, हेरिटेज सेंटर व ऐरोस्पेस म्युझियम, लालबाग बॉटनिकल गार्डन, टेंपल आदी स्थळांना भेट देणार असल्याचे समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने सांगण्यात आले.
सर्व खर्च समग्र शिक्षाद्वारे करण्यात येणार...शैक्षणिक सहलीसाठीचा खर्च समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गच्या उपक्रमांतून करण्यात येणार आहे. सहलीत सहभागी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाद्वारे अभ्यास दौऱ्याची संधी मिळाली आहे. उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार हे पथकप्रमुख असून, त्यांच्या मार्गदर्शनखाली सहलीचे नियोजन होणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास, निवास आणि जेवणाची सोय समग्र शिक्षाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांतील १३ मुली आणि १२ मुले या सहलीत राहणार असून, समवेत दाेन अधिकारी, दोन महिला शिक्षिका आणि दोन पुरुष शिक्षक राहणार आहेत.