लातूर : वासनगाव शिवारात सुरू असलेल्या जुगाराव पाेलिस पथकाने मध्यरात्री छापा मारला असून, त्यांच्याकडून ६ लाख २ हजारांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात एकूण १३ जुगाऱ्यांविराेधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधाराचा फायदा घेत दहा जुगारी पसार झाले आहेत.
सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे यांच्या पथकाची गस्त सुरू हाेती. वासनगाव शिवारात एका ढाब्याच्या पाठीमागे जुगार सुरू असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शुक्रवारी मध्यरात्री पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार पाेलिस पथकाने अचानकपणे तेथे छापा मारला. शेडमध्ये जुगार खेळताना आढळून आले. छापा मारल्यानंतर अंधाराचा फायदा घेत दहा जुगारी पसार झाले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, परिविक्षाधीन उपविभागीय पाेलिस अधिकारी अंकिता कणसे यांच्या विशेष पथकाने लातूर ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील वासनगाव शिवारात एका ढाब्याच्या पाठीमागे केली आहे. फरार झालेल्या आराेपींचा पाेलिस शाेध घेत आहेत.