लातूर : शहरातील माळी गल्ली येथील भीमाशंकर मार्गावर जलवाहिनी फुटल्याने सोमवारी तब्बल सहा तास लाखो लीटर पाणी वाया गेले. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहात असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. माळी गल्ली भागात सोमवारी दुपारी नळाला पाणी आले होते. याचवेळी वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना महापालिकेची जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात रस्त्याने पाणी वाहू लागले. स्थानिक नागरिकांनी जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला कळवूनही सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोणीही त्याठिकाणी फिरकले नसल्याचे सांगण्यात आले. वाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्या एजन्सीचा कर्मचारी घटनास्थळी होता, यावेळी नागरिकांनी रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी मनपाने परवानगी दिली का, जलवाहिनी फुटलेली असताना ती जोडण्याची जबाबदारी कोणाची, असा जाब विचारला असता, या कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे नागरिकांनी सांगितले.
वाहनधारकांसह, नागरिकांची गैरसोय
सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटली आहे. माळी गल्लीतील भीमाशंकर मार्गावर सोमवारी नळाला पाणी आले होते. त्यामुळे जलवाहिनी फुटल्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंतही रस्त्याने लाखो लीटर पाणी वाहात होते. वीजवाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्यांकडून जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. स्थानिक तरूणांनी याविषयी संबंधित कंत्राटदारला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे ॲड. गोपाळ बुरबुरे यांनी सांगितले.
दुरूस्तीचे काम सुरू...
वीज वाहिनीसाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटली. याची माहिती मिळताच पाणीपुरवठा बंद करून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराकडून दुरूस्तीचे साहित्य घेण्यात आल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नवनाथ कलवले यांनी सांगितले.