लातूर : वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देणारे ‘एमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदोद्दीन ओवेसी यांची मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने लातुरात मंगळवारी जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे लातूरचे लक्ष लागले असून, राजकीय वर्तुळातही सभेची चर्चा सुरू आहे. एमआयएमने औरंगाबाद, नांदेड महापालिका तसेच बीड आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेत चांगले यश मिळविले आहे. देवणी, जळकोट आणि चाकूर नगरपंचायतीत एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. आता लातूर मनपात परिवर्तन आघाडी करून एमआयएमने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार केला आहे. उदगीर नगरपालिकेत एमआयएमचे सहा सदस्य निवडून आले असून, आता लातूर मनपात यश मिळविण्यासाठी पक्षाच्या वतीने कंबर कसली आहे. त्यानुषंगाने मंगळवारी लातुरात होत असलेल्या जाहीर सभेत खा. असदोद्दीन ओवेसी काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एमआयएमला यश मिळाले नसले, त्यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते घेतली आहेत. दोन-तीन ठिकाणी दुसऱ्या स्थानाची तर काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मते एमआयएमला मिळाली आहेत. उदगीर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. नगरपंचायती आणि उदगीर नगरपालिकेत तर चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे लातूरच्या सभेत खा. ओवेसी समाजाची व्होट बँक वळविण्यासाठी काय जादू करतात, याकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांची एमआयएमसोबत आघाडी आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली खा. ओवेसी यांची सभा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता डॉ. आंबेडकर पार्क येथे होणार आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, आ. इम्तियाज जलील, आ. वारिस पठाण, डॉ. सुभाष माने, प्रा.डॉ. सुरेश वाघमारे, बसवंतअप्पा उबाळे, ताहेर शेख यांचीही उपस्थिती राहणार आहे. (प्रतिनिधी)
एमआयएम स्वबळावर लढणार
By admin | Published: March 06, 2017 12:45 AM