लातूर : ‘नीट’ गुणवाढीसंदर्भात लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात चार जणांविराेधात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या प्रकरणात लातुरातील दाेघांना शनिवार, रविवारी अटक करण्यात आली असून, त्यांची सध्या पाेलिस काेठडीत कसून चाैकशी सुरू आहे. राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या नीट गुणवाढ प्रकरण गृहमंत्रालयाने गांभीर्याने घेतले असून, चाैकशी अहवाल मागविल्याची माहिती समाेर आली आहे. या अहवालावर वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची नजर आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणाचा संदर्भ गुजरात, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड आणि बिहार राज्यातून बाहेर आल्याने देशभरात गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लातुरात नीट गुणवाढ करण्याचे आमिष दाखवत अनेक पालक-विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याने जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक पठाण आणि साेलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षक असलेला संजय जाधव याला अटक झाली. यातून लातूरच्या प्रकरणाचीही देशभरात चर्चा सुरू झाली आहे. अटकेतील दाेघा आराेपींची ओळख उमरगा (जि. धाराशिव) आयटीआयमध्ये नाेकरीस असलेल्या इरण्णा काेनगलवार याच्याशी झाली आणि हे कनेक्शन दिल्ली-नाेएडातील गंगाधरशी असल्याचे चाैकशीत समाेर आले आहे. आता या चाैकशीचा अहवालन राज्याच्या गृहमंत्रालयाने मागविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिस म्हणतात ‘वेट अँड वॉच’नीट गुणवाढीसंदर्भात अटकेतील आराेपींची सध्या टप्प्या-टप्प्याने चाैकशी सुरू आहे. चाैकशीत आराेपीने नाेंदविलेल्या जबाबातून अनेक किस्से समाेर येत असून, लातूर-हैदराबाद आणि दिल्लीपर्यंतच्या गंगाधरचे कनेक्शन समाेर आले आहे. याबाबत तपास करणाऱ्या सूत्रांशी चर्चा केली असता, तपशील सांगण्यास नकार देत आहेत. तपास यंत्रणेतील पाेलिस म्हणत आहेत, लातूरच्या नीट प्रकरणात सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका महत्त्वाची आहे.
इरण्णाच्या घरास टाळे;पाेलिस पथक मागावर...लातुरातील एका उच्चभ्रू साेसायटीत राहणाऱ्या इरण्णा काेनगलवार (वय ४०, रा. लातूर) याच्या घराला सध्याला टाळे आहे. लातुरातून उमरगा येथे ये-जा करणाऱ्या इरण्णाने या साेसायटीत काही वर्षांपूर्वीच घर घेत वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. लातूर पाेलिसांच्या तावडीतून इरण्णा निसटला असून, त्याच्या मागावर तपास यंत्रणांची विविध पथके आहेत.