लातूर : ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि गावातील नागरिकांना आवश्यक त्या सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत दर महिन्यातील एका विशिष्ठ दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली केली जाणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र, बहुतांश वेळा योजनेंतर्गतचा निधी कमी पडतो. तर काही वेळेस निधी उपलब्ध असूनही त्याचा गरजेच्या ठिकाणी वापर करण्यास नियमांचा अडसर येतो. त्यामुळे गावातील काही भाग अथवा संपूर्ण गाव आवश्यक त्या सुविधेपासून वंचित राहते. त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीचा भरणा केलेला कर उपयोगी पडतो. शिवाय, ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होते.
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि गावातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष कर वसुली मोहीम राबविली जाणार आहे.
१० लाखांच्या विकास कामांचे बक्षीस...कर वसुली दिनात एक लाख अथवा त्यापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसेवकाची त्यांच्या गोपनीय अहवालात नोंद केली जाणार आहे. सलग तीन महिने एक लाखापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या ३ हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्याबरोबरच १० लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली जाणार आहे. तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसुलीत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस १० लाख, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गावास ७ लाख तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.
२९ नोव्हेंबर रोजी विशेष कर वसुली मोहीम...प्रत्येक महिन्यातील एका दिवशी विशेष कर वसुली दिन राबविण्यात येणार आहे. २९ नोव्हेंबर, २३ डिसेंबर, २३ जानेवारी २०२४, २३ फेब्रुवारी या दिवशी विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत कर वसुली पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींना प्रोत्साहन...गावातील नागरिकांनी कर भरणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची कर वसुली होईल आणि त्याचा लाभ गावातील नागरिकांनाच होईल. शिवाय, शंभर टक्के वसुली बद्दल ग्रामपंचायतींना विकास निधीही दिला जाणार आहे. त्यातून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळेल.- अनमोल सागर, सीईओ
विशेष पथकांची नियुक्ती...सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, पंचायत.