औसा : अतिवृष्टी, गोगलगाय व अळीच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच उजनी, मातोळा, बेलकुंड मंडळांना नुकसानभरपाईसह पिकविम्याच्या २५ टक्के आगाऊ रक्कमेतून वगळण्यात आले. त्यामुळे विमा कंपनीच्या तुघलकी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गळ्यात गळफास लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
तालुक्यात झालेल्या नुकसानीची कृषीमंत्र्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी सरसकट मदत देण्याची हमी त्यांनी दिली. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानीपोटी तुटपुंजी मदत देण्यात आली असून, त्यातही भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे मदतीपासून वगळण्यात आलेल्या मंडळांना तातडीने मदत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, सचिन बिराजदार, धनराज गिरी, महेश बनसोडे, प्रवीण कठारे, रामप्रसाद दत्त, जीवन जंगाले, विकास लांडगे, गोविंद चव्हाण, अमोल थोरात, किशोर अगलावे, तानाजी गरड आदींची उपस्थिती होती.