राजकुमार जाेंधळे / लातूर : बसस्थानक, रेल्वेस्थानकातील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातील, पर्समधील मोबाईल, पैसे पळविणाऱ्या चाेरट्याला जेरबंद केले असून, त्याच्याकडून पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यात चाेरी, घरफाेडी, माेबाईल, पर्स पळविणे, बसस्थानकात प्रवाशांना लुटणाऱ्या आराेपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने विविध पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली. शिवाय, खबऱ्याकडून माहिती घेतली. पाेलिस पथकाला खबऱ्याने माहिती दिली. चोरीचे मोबाईल कमी किमतीत विकण्याचा प्रयत्न लातुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात केला जात आहे. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने तातडीने अजीम गौस शेख (वय २५, रा. मदनीनगर, लेबर कॉलनीनजीक, लातूर) याला ताब्यात घेतले.
पत्नीच्या मदतीने त्याने प्रशांना लुटले...
अधिक चाैकशी केली असता, त्याने आणि त्याच्या पत्नीने बसस्थानक, रेल्वेस्थानकात चढ-उतार करताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या पर्स, खिशातील पैसे, मोबाईल पळविल्याचे कबूल केले. शिवाय, कमी किमतीत मोबाईल लोकांना विक्री करत असल्याची कबुली दिली. निलंगा येथे चोरलेले पाच मोबाईल जप्त केले. त्याच्या पत्नीचा शाेध घेतला जात आहे. ही कारवाई स्थागुशाचे रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजेश कंचे, युवराज गिरी, सहायक फौजदार बेल्लाळे, अर्जुन राजपूत, मुन्ना मदने, मेघा देवमाने यांच्या पथकाने केली.