पशुपालकांना दारापर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना’ अंतर्गत ८१ तालुक्यांमध्ये नवीन फिरते पशुचिकित्सालय पथक स्थापन करण्यास कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २५ फेब्रुवारी २०१९ राेजी मान्यता दिली असून, लातूर जिल्ह्यात जळकोटसह तीन फिरती पथके मंजूर करण्यात आली आहेत.
तथापी, १५ जानेवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार या फिरत्या पशुचिकित्सालयाच्या पथकांसाठी ७१ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये जळकोट तालुक्यातील पशुपालकांवर अन्याय करण्यात आला आहे. जळकोटसाठी मंजूर असलेले हे पथक ऐनवेळी लातूर ग्रामीणसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे या तालुक्यातील पशुरुग्णांपुढे आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
हा डोंगरी, दुर्गम आणि अत्यल्प पर्जन्यमानाचा तालुका आहे. त्यामुळे शेतीतून धड उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आपला चरितार्थ चालविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय करतात. हा वाडी - तांड्यांचा तालुका असून तालुक्यातील बंजारा समाजही प्रामुख्याने पशुपालन करतो. त्यामुळे तालुक्यात ५० हजारांपेक्षाही अधिक पशुधन आहे.
तथापी, पुरेशा प्रमाणात तालुक्यात पशु रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने पशुधनांचा अनेकदा तडफडून मृत्यू होत आहे. हे मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी जळकाेट तालुक्यात नवीन पशुवैद्यकीय दवाखाने आणि फिरते पशुचिकित्सालय पथक स्थापन करण्याची मागणी आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले आणि आता सुरु होण्याच्या स्थितीत असलेले हे पथक पळविण्यात आले आहे. आता ते लातूर ग्रामीणमध्ये सुरु होणार आहे. परिणामी, जळकाेट तालुक्यातील हजाराे पशुपालकांची हेळसांड हाेत आहे.