औसा - महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा यांच्यात युतीत अनेकदा मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यांच्यातून युतीत अनेक ठिणग्या पडल्याचं दिसून आलं आहे. एकमेकांवर टीका करणारे शिवसेना-भाजपाचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हातात हात घालून फिरताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते.
यावेळी सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आगमन झाले. तेव्हा व्यासपीठावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा हात हातात घेत व्यासपीठावर एन्ट्री केली. त्यामुळे मागील साडेचार वर्षात शिवसेना-भाजपामधलं सुरु असलेलं भांडण आणि त्यातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचं बोललं जातंय.
मात्र महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे असे शिवसेना नेते छातीठोकपणे सांगत असतात, भाजपाचे नेतेही राज्यभरात आम्ही मोठे भाऊ म्हणून प्रचार करतात. अशातच आज व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना नरेंद्र भाई असा उल्लेख करुन केली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यात भाषणात माझा छोटा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.
लातूर येथे महाआघाडीच्या सभेनिमित्त अनेक दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. युती जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकेचे बाण चालवण्यात येत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी भाजपा-शिवसेनेने आपापसातले वाद मिटवत पुन्हा निवडणुकीसाठी युती जाहीर केली. विरोधकांवर शिवसेना-भाजपाच्या युतीवर तोंडसुख घेतले.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या संकल्पपत्राचं कौतुक करत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये जी वचनं दिली गेली आहेत तीच वचनं आणि त्याच कारणांसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी झाली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तर आधीचे सरकार अतिरेक्यांसमोर किंबहुना दहशतवाद्यांसमोर माना झुकवणारे होते, पण आजचं आपलं हे सरकार पाकिस्तानने जर का कुरापत काढली तर नुसते बोलत नाही तर पाकिस्तानला ठोकतो आणि ठोकणारचं असं सांगत उद्धव ठाकरेंनी तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे? असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला केला.