औराद शहाजानी (जि.लातूर): निलंगा तालुक्यातील साेनखेड येथे रविवारी सायंकाळी पुन्हा उपद्रवी वानराने धुमाकूळ घालत पाच नागरिकांना जखमी केले. दरम्यान, पुन्हा सहा दिवसांनंतर वानराने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांत दहशत पसरली आहे.
साेनखेड येथे गेल्या आठवड्यात उपद्रवी वानराने धुमाकूळ घालत तब्बल ६० नागरिकांवर हल्ला करून जखमी केले हाेते. सदर गावात जिल्ह्यातील अनेक वनविभागाच्या पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला; पण यश न आल्याने औरंगाबाद येथील खासगी रेस्क्यू टीमला पाचारण करून २७ नाेव्हेंबर रोजी सहा वानराला जेरबंद करून औरंगाबादला घेऊन गेले. यात उपद्रवी वानर पकडल्याचा दावा वनविभागाने केला हाेता; पण त्याच सायंकाळी पुन्हा वानराने पाच ग्रामस्थांचा चावा घेत त्यांना जखमी केले हाेते. यानंतर दाेन दिवस गावात वनविभागाची टीम ठाण मांडुन हाेती.
रविवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी अचानक वानराने धुमाकूळ सुरू करत गावातील किराणा दुकानात प्रवेश करुन एकाच्या नाकाचा चावा घेतला.इतर चार नागरिकांचा चावा घेत धुमाकूळ घातल्याने या अचानक झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थ घाबरले असून गावात काठ्या घेऊन फिरावे लागत असल्याचे ग्रामस्थ बजरंग पाटील यांनी सांगितले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अनेकजण जागरण करीत बसले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"