लातूर : उन्हाळी हंगामात वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वे विभागाच्या वतीने आता लातूर स्थानकातून धावणाऱ्या मुंबई-पुणे-हैदराबाद विशेष सुपरफास्ट रेल्वे बुधवारपासून धावणार आहे, अशी माहिती मध्ये रेल्वेच्या साेलापूर विभागाच्या वतीने देण्यात आली. या एक्सप्रेस रेल्वेचा उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांना माेठा आधार मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या साेलापूर विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रवाशांच्या मागणीचा विचार करून, रेल्वे विभागाच्या वतीने उन्हाळी एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे-हैदराबाद (गाडी क्र. ०११३७ / ०११३८) ही विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेगाडी धावणार आहे. ही रेल्वे लातूर स्थानकात रात्री ११:५० वाजता, तर हैदराबाद येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:३० वाजता पाेहोचणार आहे. मुंबईकडे जाताना ही रेल्वे लातूर रेल्वेस्थानकात पहाटे ३:५० वाजता दाखल हाेणार आहे. या रेल्वेतील डब्यांची संरचना करण्यात आली असून, गार्ड कम लगेज - २ डबे, जनरल - ११, चेअर कार - ३, एसी-१ असे एकूण १४ डबे राहणार आहेत.
मुंबई येथून दर बुधवारी रात्री सुटणार...गाडी क्रमांक ०११३७ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हैदराबाद विशेष एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाहून दर बुधवारी रात्री १२:३० वाजता सुटणार आहे. पुढे दादार, ठाणे, कल्याण, लाेणावळा, पुणे, दाैंड, कुर्डूवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर, लातूर राेड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेठ, हैदराबादला संध्याकाळी ६:३० वाजता पाेहोचणार आहे.
हैदराबाद स्थानकातून रात्री सुटणार एक्स्प्रेस...गाडी क्रमांक ०१३३८ : हैदराबाद-पुणे विशेष एक्स्प्रेस हैदराबाद स्थानकातून रात्री आठ वाजता सुटणार आहे. पुढे बेगमपेठ, लिंगपल्ली, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर राेड, लातूर (आगमन ३:३० वाजता आणि प्रस्थान ३:५५) धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डूवाडी, दाैंड, पुण्याला गुरुवारी रात्री १२:०५ वाजता पाेहोचणार आहे.