शिरुर अनंतपाळ : घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणीलातूरनजिकच्या महाराणा प्रताप नगरला नेण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. त्यास विरोध करण्यासाठी मागील १२ दिवसांपासून विविध पध्दतीने आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी मुंडन आंदोलन करून प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील घरणी मध्यम प्रकल्पावरून ७० गावांना पाणीपुरवठ्यासह शेतीला सिंचन योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, या घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरनजिकच्या महाराणा प्रतापनगरला नेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जलयोजना मंजूर करण्यात आली. या जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वपक्षीय नेते एकवटले असून घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव कृती समितीच्या वतीने मागील १२ दिवसांपासून येथील महात्मा बसवेश्वर चौकातील पोलिस चौकीसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
कधी रास्तारोको, मोर्चा, अन्नत्याग, जलकुंभावर चढून शोले स्टाईल तर कधी जागर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून या जलवाहिनीच्या खोदकामास कायमस्वरूपी स्थगिती देण्यात येत नाही. त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी शुक्रवारी धरणे आंदोलन ठिकाणी मुंडण आंदोलन केले. जलवाहिनीसाठीचे खोदकाम तात्काळ कायमस्वरूपी थांबविण्यात यावे, अन्यथा आगामी काळात आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले. यावेळी धोंडिराम सांगवे, शिवाजी पेठे, अतुल माने, सुमतीनंदन दुरुगकर, संतोष शिवणे, संतोष शेटे, महादेव आवाळे, विशाल गायकवाड, सुतेज माने, व्यंकट हंद्राळे, ओम बिराजदार, महेश उंबरगे, प्रसाद शिवणे, नरसिंग कामगुंडा, व्यंकट पेंढारकर आदींची उपस्थिती होती.
१२ व्या दिवशी बारा जणांचे मुंडण...घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी महाराणप्रताप नगरला नेण्यात येऊ नये म्हणून मागील बारा दिवसांपासून विविध पध्दतीने आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी आंदोलनाचा बारावा दिवस होता. या दिवशी एकनाथ हायणे, बालाजी नाटकरे, शेषेराव मादळे, शिवा व्यवहारे यांच्यासह बारा जणांनी मुंडण करून प्रशासनाचा निषेध केला.