लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेने मास्क वापरणे अनिवार्य केले असून, न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोमवारी महानगरपालिकेच्या पथकाने चारही झोनमध्ये कारवाई करून २७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
डी झोनअंतर्गत झोनल अधिकारी बंडू किसवे यांच्या पथकाने सोमवारी गांधी चौक येथे मास्क न वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक सोनवणे, अमजद शेख, हिरालाल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. क्षेत्रीय कार्यालय बी झोनमध्ये विनामास्क वावरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ७७ नागरिकांना दंड आकारून त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रुपये वसूल करण्यात आले. या मोहिमेत दिवसभरात ७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेंतलवाड, हेड काॅन्स्टेबल गीते, सहायक स्वच्छता निरीक्षक सिदाजी मोरे, रवी शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.