लातूर : शहरातील विविध मार्गावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने हातोडा घातला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. तर सोमवारी बार्शी रोड, पीव्हीआर चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने गेल्या आठ-दहा दिवसांपासून लातूर शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फूटपाथवर असलेले अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात जुना रेणापूर नाका ते नवीन रेणापूर नाका दरम्यान करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. त्यानंतर औसा राेड, राजीव गांधी चाैक परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने हटविण्यात आली आहेत. ही माेहीम सकाळी ९ वाजल्यापासूनच सुरु केली जात आहे. साेमवारी लातूर शहरातील प्रमुख असलेल्या बार्शी राेडवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. शिवाय, पीव्हीआर चाैकातील अतिक्रमणही हटविण्यात आले. लातुरात सर्वच प्रमुख रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.