उदगीरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसरात अनेकांनी अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले आहे. या माध्यमातून लाखाे रुपयांचे भाडे वसूल करण्याचा व्यवसायच अतिक्रमणधारकांनी गत अनेक वर्षापासून सुरु केला हाेता. सदरचे अतिक्रमण एखाद्या अधिकाऱ्याने पाडण्याचा प्रयत्न केला तर, न्यायालयात याचिका दाखल करुन यामध्ये खाेडा घातला जात हाेता. २०१२ साली तत्कालीन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सुशील खोडवेकर यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यातही प्रकरण न्यायप्रविष्ठ करून कारवाईस अडथळा आणला गेला. त्यानंतर २०१७ साली नितीन कापडणीस मुख्याधिकारी म्हणून येथे आले हाेते. त्यांनीही शहरातील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे ही मोहीम मध्येच बंद पडली. दरम्यान, बसस्थानकासमोरील शिवाजी सोसायटीतील रहिवासी स्व. सी.पी. पाटील आणि उदगीर नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यातील न्यायालयीन वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. २० नोव्हेंबर रोजी न्यायालयाने निकाल देऊन सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावेत. त्याबाबतचा अहवाल एक महिन्याच्या आत छायाचित्रासह सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्याची प्रत उदगीरच्या नगरपालिकेला २ डिसेंबर रोजी प्राप्त झाली. त्यानुसार पालिका प्रशासनाने कारवाई करीत मंगळवारी सकाळपासून अतिक्रमणावर हाताेडा घातला.
नागरिकांनी अतिक्रमण काढून घ्यावे...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरपालिका प्रशासन कारवाई करीत आहे. या रस्त्यावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्या नागरिकांनी आपले अतिक्रमण तातडीने काढून घ्यावेत, अन्यथा पालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. हा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे. असे नगर पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठाेड म्हणाले.