शहरात थोडगा रोड येथील खासगी जागेत ४२ कुटुंबे मागील २० ते २५ वर्षांपासून राहत असून, त्यांच्याकडे आधारकार्ड, रेशन कार्ड, तसेच त्यांची मुले शहरातील शाळेत शिक्षण घेत आहेत. हे निराधार शहरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, खासगी जागेवरील अतिक्रमण काढल्यानंतर नगरपालिकेने कचरा वेगळा करण्याच्या अटीवर त्यांना काही जागा एमआयडीसीजवळच्या डंपिंग ग्राउंड येथे दिली होती. मात्र, त्या ठिकाणी या कुटुंबाबरोबर शहरातील अन्य लोक नगरपालिका कबालनामे देणार असल्याचे समजून त्या ठिकाणी आपले घर करून राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे नगरपालिकेचे डंपिंग ग्राउंड पूर्णत: झोपड्यांनी भरून गेले.
पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणधारकांना तेथून काढले. त्यांच्या झोपड्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे निराधार व निराश्रित मजुरांनी तहसील कार्यालयाच्या आवारात ठाण मांडले आहे. आम्हाला गायरान जागेवर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयाने हा विषय आपल्या कक्षेत येत नसल्याचे सांगून त्यावर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या गोंधळामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्वरित गायरान जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अण्णाराव सूर्यवंशी, गोविंद कांबळे, शीलाताई शिंदे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, आदींनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेशन, आधार कार्ड असूनही अडचण...
रेशनकार्ड, आधार कार्ड आहे. पण, राहण्यासाठी घर नाही. ही कुटुंबे कर्नाटकातून येथे स्थायिक झाली आहेत. २५ वर्षांपासून ती येथे राहत असल्यामुळे त्यांना येथील रहिवासी म्हणून गणले जात आहे. प्रत्येक वेळेस ते मतदान करतात. त्यांची मुले ही वेगवेगळ्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. शिवाय, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सुविधा आहे. परंतु, राहण्यासाठी घर नाही, असे अण्णाराव सूर्यवंशी यांनी सांगितले.