देवणी ( लातुर) : तालुक्यातील बोंबळी येथील बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा रविवारी जवळच्या विहिरीत मृतदेह आढळून आला. मृत्यूचे गुढ कायम असून पतीसह सासरची मंडळी फरार झाल्याने संतप्त होऊन माहेरच्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात चौघावर गुन्हा दाखल झाला. ही घटना रविवारी ( दि.२३) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोंबळी येथून विवाहिता मिनाक्षी सुग्रीव भोसले ( ३०) या शनिवारी दुपारपासून बेपत्ता होत्या. वलांडी येथील माहेरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. कोठेही यश आले नाही. दुसऱ्या दिवशी बोंबळी शिवारातील विहिरीजवळ तिच्या चप्पल आढळून आल्यानंतर त्यात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा झाल्यावर वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, शनिवार पासूनच मीनाक्षी यांचा पती, दोन मुले आणि सासरची मंडळी फरार आहेत. यामुळे संतप्त होऊन तिच्या माहेरच्यांनी शवविच्छेदना नंतरही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शविला.
हुंड्याचे राहिलेले ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये म्हणून शारीरिक मानसिक त्रास देऊन माझ्या मुलीच्या मृत्यूस कारणीभुत असणाऱ्यावर कारवाई करावी अशी फिर्याद अंगद गुंडाजी जगताप यांनी दिली. यावरुन पती सुग्रीव उर्फ यशवंत भानुदास भोसले, भानुदास सुखवंत भोसले, सोजरबाई भानुदास भोसले, पप्पू भानुदास भोसले या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजणकर व पोलीस निरीक्षक दिपक शिंदे यांनी मयत विवाहितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गजानन अंतापुरे हे करत आहेत.