लातूर : शहरातील गंजगाेलाईच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली हाेती. दरम्यान, या खुनातील दाेन आराेपी फरार झाले हाेते. यातील एकाच्या मुसक्या आवळण्यात गांधी चाैक पाेलिसांना शनिवारी यश आले आहे. त्याला लातूर न्यायालयात हजर केले. १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, गांधी चाैक पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ११ सप्टेंबर रोजी गंजगोलाई परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या छतावर सलमान उर्फ दस्तगीर शाबुद्दीन शेख (३०, रा. महापूर) या तरुणाचा गुन्ह्यातील संशयितांनी पूर्ववैमनस्यातून जबर मारहाण करून खून केला होता. याबाबत गांधी चौक पाेलिस ठाण्यात गुरनं. ४४७ / २०२३ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला हाेता. घटनेपासून दाेन्ही आरोपी फरार होते. आराेपींच्या शाेधासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या पथकाने आराेपींचा शाेध घेतला. पथकाने विविध ठिकाणी आराेपींचा माग काढला. खबऱ्याच्या माहितीनुसार फरार आरोपी विशाल उत्तम रणदिवे (रा. देवळी, ता.जि. लातूर) हा लातुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लपून फिरत असल्याची माहिती मिळाली. पाेलिस पथकाने तातडीने विशाल रणदिवे याच्यावर झडप मारून मुसक्या आवळल्या. चाैकशीमध्ये त्याने पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली. दुसऱ्या फरार आराेपींचा पाेलिस शाेध घेत आहेत. तपास सपोनि. श्रीशैल्य काेले करत आहेत.
ही कामगिरी गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, पोउपनि. अक्रम मोमीन, राजेंद्र टेंकाळे, दामोदर मुळे, राम गवारे, उमाकांत पवार, दत्तात्रय शिंदे, रणवीर देशमुख, शिवा पाटील यांच्या पथकाने केली.