उदगीर : शहरात तरुणाचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याच्या आरोपावरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अति. न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी मंगळवारी ठोठावली.
२९ जुलै २०२१ रोजी उदगीर येथील महात्मा बसवेश्वर चौकात आरोपी अमित उर्फ सोन्या प्रकाश नाटकरे याने धारदार चाकूने जगदीश किवंडे यांस क्षुल्लक कारणावरुन जबर मारहाण केली होती. त्यात जगदीश किवंडे याचा मृत्यू झाला होता..यातील मयताची आई सुनिता विजय किवंडे यांच्या तक्रारीवरुन उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करुन या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक येडके यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अति. जिल्हा सत्र न्यायालय, उदगीर येथे पिठासन अधिकारी न्या.पी.डी. सुभेदार यांच्या न्यायदालनात चालला व यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीपुराव्यांवर व कागदपत्रावरती तसेच सहा. सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व ५,०००/- रु. दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून ॲड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. सिकंदर शेख यांनी सहकार्य केले.