शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : तालुक्यातील सावरगाव शिवारात शेती असून, शिवाजी तानाजी काळे (वय २४, रा. मुशीराबाद, ता. लातूर) हे शेतात झोपले असता लहान भावाने डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांचा खून केला. ही घटना २ नोव्हेबर राेजीच्या रात्री घडली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या भीतीपोटी मुशिराबाद येथे वडील तानाजी काळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पाेलिसांनी सांगितले, मुशीराबाद येथील तानाजी काळे यांची शिरूर अनंतपाळ तालुक्यात सावरगाव शिवारात शेती आहे. तानाजी काळे यांना दोन मुले होती. मोठा मुलगा शिवाजी तानाजी काळे हा अविवाहीत असून, सतत दारू पिऊन चोऱ्या करत असत. दिवसभर दारूच्या नशेत असायचा. शिवाजी हा चोरी करत असल्याने पोलिस आणि गावातील लोक तानाजी काळे (रा. मुशीराबाद) यांच्या घराकडे सतत चौकशीला येत असत. घरच्या व्यक्तीना तुमचा मुलगा कुठे आहे सांगा? आमची चोरी केला आहे, असे म्हणून भांडण करत असत. लोकांसह पोलिसांच्या चाैकशीने घरातील लोक त्रास्त झाले हाेते. या त्रासाला कंटाळून लहान भाऊ बालाजी तानाजी काळे याने शेतात झोपलेल्या माेठा भाऊ शिवाजी काळे याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना २ नोव्हेंबर राेजीच्या रात्री ९:३० ते ११:३० दरम्यान घडली.
याबाबत मयताची बहीण अहिल्या जितीन हुडे (वय २८, रा. बागझरी ता. अंबाजोगाई, जि. बीड हा. मु. मुशिराबाद ता. लातूर) यांच्या तक्रारीवरून शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात बालाजी तानाजी काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड पाेलिसांनी जप्त केली असून, भावाचा खून केल्याची कबुली त्याने चाैकशीत दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार करीत आहेत.