किनगाव (जि. लातूर) : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईच्या डाेक्यात लाेखंडी पहार घालून खून करण्यात आल्याची घटना सताळा (ता. अहमदपूर) येथे शुक्रवारी रात्री ८:३० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास मुलाविराेधात गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पाेलिसांनी सांगितले, सताळा येथील २३ वर्षीय तरुण ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय २३) हा दारूच्या आहारी गेला असून, दरम्यान, घरात आई आणि मुलगा दाेघेच हाेते. दारू पिण्यासाठी शुक्रवारी रात्री मुलाने आई संगीता नाथराव मुंडे (वय ४०) यांच्याकडे पैशाची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने रागात आलेल्या ज्ञानेश्वरने उखळात कुटण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी घुसा (पहार) आईच्या डोक्यात घातला. यामध्ये आई गंभीर जखमी झाल्याने जागेवरच काेसळली. यावेळी आई जमिनीवर काेसळल्यानंतर त्याने घराला कडी लावून पळ काढला. बाहेरगावी नातेवाइकांकडे मुक्कामी गेलेल्या नाथराव मुंडे यांना घटनेची माहिती मिळाली. ते तातडीने घराकडे आले असता, घडलेला प्रकार समाेर आला.
याबाबत नाथराव मुंडे यांनी किनगाव पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर मुंडे यांच्या विराेधात सुमारास गुरनं. ३१३ / २०२३ कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून, घटनास्थळी अहमदपूर उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांनी भेट देऊन पाहणी केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करीत आहेत.