पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील बामणी येथे शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जगन्नाथ किसन शिंदे (४१) यांच्यावर काठीने हल्ला करून त्यांचा खून केल्याची घटना घडली. यावेळी मयताची बहीण सुनीता अर्जुन रणदिवे यांच्या फिर्यादीवरून बाबू ऊर्फ विजय ढाले, हनुमंत माणिक गायकवाड, राम हनुमंत गायकवाड, गोरख हनुमंत गायकवाड, अरविंद नामदेव गायकवाड, शशिकांत ऊर्फ संदेश अरविंद गायकवाड, मल्हारी रंगराव गायकवाड, दिगंबर परमेश्वर गायकवाड, शंभो मल्हारी गायकवाड (सर्व जण रा. बामणी) यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मयत जगन्नाथ शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. तेव्हा मयताच्या नातेवाइकांनी जोपर्यंत सर्व आरोपींना अटक केली जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत निलंगा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
तासभर रास्ता रोको...
आक्रमक झालेल्या नातेवाइकांनी मुख्य रस्ता अडवून एक तास रास्ता रोको केला. यावेळी क्रांतिवीर लहुजी सेनेचे जिल्हा प्रवर्तक सत्यभाई शिंदे, जिल्हाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा गंगाबाई कांबळे, दिलीप गायकवाड, शिवाजी वाघमारे यांनी सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
या घटनेची माहिती समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपाधीक्षक दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल चोरमले पुढील तपास करीत आहेत.