अनिल तात्याराव सोळुंके (५५, रा. येळनूर, ता. निलंगा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी आकाश अनिल सोळुंके व अनिल तात्याराव सोळुंके हे दोघे दुचाकीवरुन जात होते. तेव्हा दिलीप सोळुंके, सिद्धू माने, विक्रम सोळुंके, दीपक सोळुंके, व्यंकट माने, तानाजी माने, बंकट माने, बिभीषण पवार, शेखर पवार, शिवाजी माने, परमेश्वर माने, सचिन सोळंके, सिद्धेश्वर सोळंके, सुरेश सोळुंके, पवन सोळुंके, विनोद सोळुंके, विशाल सोळुंके, वृश्चिकेत पवार, करण सोळंके, राहुल पवार, संजय सोळुंके, राजू सोळुंके (सर्वजण रा. येळनूर) हे आपल्या चारचाकी वाहनातून पाठलाग करीत आले. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, दगड होते. या सर्वांनी अनिल सोळुंके व आकाश सोळुंके यांना आमच्या विरोधात औराद पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला खल्लास करतो असे म्हणत पाठलाग करीत होते. तेव्हा सोळुंके पिता-पुत्र जीवाच्या भीतीने दुचाकीवरुन शिंदखेड- गुंजरगा पाणंद रस्त्याने पळून जात होते. तेव्हा सदरील २२ जणांनी सिंदखेड शिवारातील ओढ्यात गाठून पिता- पुत्रास काठी, दगड, चाकूने मारहाण केली. त्यात अनिल सोळंके मयत झाले तर त्यांचा मुलगा आकाश गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आकाश सोळुंके याच्या फिर्यादीवरुन २२ जणांविरुध्द कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक उदय सावंत हे करीत आहेत.
नातेवाईकांचा आक्रोश...
मयत अनिल सोळुंके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तेव्हा २२ आरोपींना जोपर्यंत पकडले जाणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेऊन आक्रोश सुरु केला होता. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक डॉ. दिनेश कोल्हे यांनी घटनास्थळास भेट देऊन चौकशीचे आदेश दिले. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून २१ जण फरार आहेत.