मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे अनेक मुलींना तसेच बच्चे कंपनीला आपल्या मामाच्या गावाला जाता आलेले नाही. अक्षय तृतीयेला अनेक मुली माहेरी जाण्याची परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे अक्षय तृतीयाही मोठ्या उत्साहात साजरी करता आली नाही.
माझं माहेर माहेर...
कोरोनामुळे आईची भेट होऊ शकली नाही. नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी झाला, तेव्हाच भेट झाली होती. दरवर्षी उन्हाळ्यात, अक्षय तृतीया, सणावाराला माहेरी जाण्याचा योग येत होता. मात्र कोरोनामुळे माहेरी जाण्याचा योग आलाच नाही.
- योगिता कांबळे
आई-वडील गावी राहतात. सासरी येऊन दहा महिने झाले आहेत. मात्र कोरोनामुळे माहेरच्या मंडळींची भेट होऊ शकली नाही. केवळ फोनवरच ख्यालीखुशाली विचारता येत आहे. प्रत्यक्ष भेट आता कोरोनाचे संकट संपल्यानंतरच होईल.
- वैष्णवी महामुनी
रक्षाबंधनाच्यावेळी भावाची भेट झाली होती. मात्र तेव्हापासून माहेरी जाण्याची ओढ आहे. संचारबंदीमुळे एसटी बसेस तसेच प्रवासासाठी मनाई असल्याने माहेरी जाता आलेले नाही. मुलेही मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक आहेत.
- वैशाली शिंदे
लागली लेकीची ओढ...
मागील एक वर्षापासून मुलगी माहेरी आलेली नाही. मुलीसोबतच नातवांना भेटण्याची ओढ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने भेट दुरावत चालली आहे. संकट लवकर संपो आणि आमच्या माय-लेकींची भेट होवो.
- सुनीता आगळे
मागीलवर्षी दिवाळीला मुलगी घरी आली होती, तेव्हापासून तिची अजूनपर्यंत भेट नाही. केवळ फोनवरतीच आणि व्हिडिओ कॉलवरच दररोज संभाषण होत आहे. कोरोनामुळे माणसे दुरावत चालली आहेत.
- राणी ढोले
कोरोनाने अनेक नाती दूर केली. मुलीला माहेरी येण्यापासून रोखले आहे. कधी कोरोना कमी होतो, तर अचानक वाढतो, तर कधी गाड्याच बंद असतात. त्यामुळे मुलीला माहेरी येता आले नाही. आठवण येते.
- सुभद्रा शिंदे
मामाच्या गावाला कधी जायला मिळणार
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांत मामाच्या गावाला जात असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जाता आलेले नाही. कोरोना संपला की मामाच्या गावाला जाऊ, असे आई सांगते. शाळा बंद असल्याने कंटाळाला आला आहे.
-
वर्षभर शाळा बंद असल्याने खूप कंटाळा आला आहे. मामाच्या गावाला वर्षातून दोन ते तीन वेळेस जाणे व्हायचे. मात्र कोरोना आल्यापासून मामाच्या गावाला काही जाता आलेले नाही. आजी-आजोबांचीही भेट झालेली नाही.
-
कोरोनामुळे बाहेर खेळायला जाणेही बंद आहे. घरातच राहून कंटाळा आला आहे. सण-उत्सवाला मामाच्या घरी जात असतो. मात्र यावर्षी मामाही न्यायला आला नाही. त्यामुळे कोरोना संपल्यानंतरच मामाच्या गावाला जाता येणार आहे. -