औसा (जि. लातूर) : तालुक्यातील नांदुर्गा, गुबाळ, गांजनखेडासह परिसरात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भूगर्भातून गुढ आवाज आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले हाेते. दरम्यान, लातूर येथील भूकंपमापक केंद्रावर या आवाजाची कुठलीही नोंद झालेली नसून, हा भूगर्भातील आवाज असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
औसा तालुक्यातील किल्लारीपासून काही अंतरावर असलेल्या नांदुर्गा, गुबाळ, गांजनखेड्यासह परिसरात गुरुवारी दुपारी भुगर्भातून गुढ आवाज आला. या आवाजामुळे नागरिक घराबाहेर पडले होते. दरम्यान, गुढ आवाजाने नांदुर्गा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्यांना तडे गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घटनास्थळी सरपंच अश्विनी घाडगे, शालेय समिती अध्यक्ष परमेश्वर श्रीखंडे यांच्यासह गावकऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली आणि मुलांना शाळेच्या प्रांगणात बसविले. गुढ आवाजामुळे नांदुर्गा परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
भूकंप नव्हे भूगर्भातून गुढ आवाज...औसा तालुक्यातील नांदुर्गा परिसरात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भूगर्भातून आवाज आला. याबाबत भूकंपमापक केंद्रावर कोणतीही नाेंद झालेली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. औशाचे प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे म्हणाले, नांदुर्गा परिसरातील मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पाहणी केली आहे. याठिकाणी भुगर्भातूनच आवाज आलेला आहे. कोणतीही हानी झालेली नाही.