लातूर : पवनार ते पत्रादेवी (नागपूर- गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून जात आहे. त्यासाठी भूसंपादन होणार आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी भूमिहिन होणार आहेत. परिणामी, या महामार्गाबद्दल मुरुड अकोला येथील शेतकऱ्यांनी आक्षेप घेत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या आहेत.
पवनार ते पत्रादेवी (नागपूर- गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रूतगती महामार्ग (विशेष क्र. १०) हा होणार आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील २१ गावांच्या हद्दीतील शिवारातून जाणार आहे. त्यात लातूर तालुक्यातील मुरुड अकोला गावाचाही समावेश आहे. त्यासाठी आगामी काळात भूसंपादन होणार आहे. दरम्यान, या महामार्गासंदर्भात आक्षेप मागविण्यात आले आहेत.प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत मुरुड अकोला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. सध्याच्या जमिनी ह्या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहेत. विशेषत: जमिनी ह्या यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास आम्ही अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो. तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
विशेष म्हजणे, काही जमिनी ह्या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात एनए प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर आमच्या जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. या जमिनी संपादित केल्यास आमचे कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
आमच्या जमिनी संपादित करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदवावर केदारनाथ बिडवे, श्रीमंत बिडवे, उत्तरेश्वर गिराम, जयश्री गिराम, लिंबाबाई गिराम, कलावती बनाळे, सोमेश्वर बिडवे, रामभाऊ शेळके, जयलिंग बिडवे, धनराज कुर्डे, संतोष तोडकर, श्रीपती बिडवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.