देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे गाव तालुक्यातील सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव असून, केवळ ११० उंबरे असलेल्या या छोट्याशा गावाने सन २०१८ च्या पाणी फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या वॉटरकप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केले. गावातील लोकांनी रात्रंदिवस श्रमदान करून, गावेच पाणीदार केली आहेत. या गावाची आता स्वतंत्र ओळख गावकऱ्यांनी आपल्या श्रमदानातून केली आहे. येथील ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीतून अर्थकारण साधले आहे. तालुक्यात दुसरा येण्याचा मान गावाला मिळाला असून, पाच लाखांचे बक्षीसही मिळाले आहे. याच निधीतून गावातील गायरानावर तहसीलदार सुरेश घाेळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पुढाकार घेत कोईमतूर जातीचे २५० चिंचवृक्षाची लागवड केली. या वृक्षलागवडीची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली; तर लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या बाल उपक्रमाची पाहणीही त्यांनी केली.
यावेळी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच विष्णुदास गुणाले, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, तलाठी निंगुले अनिता, विस्तार अधिकारी मस्के, कैलवाडे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग गुरुडे, दत्ता कोंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले, धोंडराज गुणाले, शिक्षिका गुंगे, गायकवाड, केंद्रप्रमुख येलमटे, आदी उपस्थित होते.
गावकऱ्यांनी राबविला विधायक उपक्रम...
नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीला पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाच लाखांचे पारितोषिक मिळाले. याच रकमेतून गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण न होऊ देता, फळझाडे लागवड करण्यात आली. यातून पर्यावरण संतुलनाबरोबर आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी काैतुक केले असून, याचा आदर्श इतर गावांनी घेतला तर ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.