लातूर : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्त्वाचे पद असून, या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे नसल्याने नायब तहसीलदारांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी आंदोलनाचा तिसरा दिवस असून, आंदोलन अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, या आंदोलनात तहसीलदारांनीही सहभाग नाेंदविला असून, कामकाज ठप्प झाले आहे.
नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचा ग्रेड पे ४,८०० रुपये मंजूर करण्यात यावा, यासाठी १९९८ पासून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. यापुर्वीही प्रशासनास तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या संघटनेने निवेदने दिली होती. मात्र, त्यावर निर्णय न झाल्याने सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार महेश परंडेकर, शोभा पुजारी अहमदपूर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार राजेश जाधव, परविन पठाण, कुलदीप देशमुख, भीमाशंकर बेरुळे, हरीश काळे, एस.एस. उगले, बेंबळगे, कानडे, बिराजदार, तरंगे, महापुरे, अडसूळ, कोठुळे, कराड, दत्ता कांबळे, देशतवाड आदींसह संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते.