लातूर : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद असून, या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे नसल्याने नायब तहसीलदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला असून, तहसीलदारांनीही नायब तहसीलदारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचा ग्रेड पे ४८०० रुपये मंजूर करण्यात यावा, यासाठी १९९८ पासून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. शासनाकडून दखल घेतली जात नाही. अपर मुख्य सचिवांच्या बैठकीत महसूलमंत्री व वित्त मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन निघाले होते. परंतु, शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
लातूर येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तहसीलदार स्वप्नील पवार, भारत सूर्यवंशी, सुरेश घोळवे, धम्मप्रिया गायकवाड, रामेश्वर गोरे, प्रसाद कुलकर्णी, महेश परांडेकर, महेश सावंत, शोभा पुजारी, नायब तहसीलदार राजेश जाधव, कुलदीप देशमुख, भीमाशंकर बेरुळे, प्रभू जाधव, सुधीर बिराजदार, लालासाहेब कांबळे, प्रवीण आळंदकर, सुरेश पाटील, शिवमूर्ती बनसोडे, हरिश काळे, परवीन पठाण, धनश्री स्वामी आदींसह विविध तहसील कार्यालयांतील नायब तहसीलदार आंदोलनात सहभागी होते.
बेमुदत काम बंद आंदोलन नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग यांचे ग्रेड पे ४८०० करण्याची न्याय मागणी आहे. या अनुषंगाने त्रुटी समितीची बैठकही झाली होती. कामाचे स्वरूप, जबाबदारी इत्यादी सर्व माहिती असूनही ते लागू केला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.