राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची अहमदपूर जन्म आणि कर्मभूमी आहे. त्यांनी अहमदपूर शहराच्या नावाचा गौरव महाराष्ट्रासह देशभरात केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत, सामान्यांना कायम स्मरण रहावे, यासाठी अहमदपूर शहरात नगर परिषदेच्यावतीने आरक्षण क्रमांक ३६ ब येथे उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. फुजैल जागीरदार, भाजपचे गटनेते राहुल शिवपुजे, संदीप चौधरी, रवी महाजन, बाळासाहेब लखनगिरे, अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, कमल आगलावे, सय्यद ताजोद्दीन, सय्यद सर्वरलाल, तनुजा सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
सर्वसाधारण सभेत हाेइल निर्णय...
अहमदपूर येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय याबाबत ठराव घेण्यासाठी सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात येणार आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडूनही सूचना आली आहे, असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.