चापोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदारांमार्फत ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समित्या गठण करण्यात आल्या आहेत. या समितीला काही अधिकारही देण्यात आले आहेत. परंतु, या समित्यांची असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समित्या नामधारी ठरल्या आहेत. तसेच लोकसेवक कर्मचारी मुख्यालयी राहण्यास ठेंगाच दाखवित आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, समितीतील सदस्यांचे कोरोना दक्षतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे. राजकारण, भाऊबंदकी, नात्यागोत्यामुळे ही समिती नावापुरतीच ठरली आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी चेह-यास मास्क लावला जात नाही. तसेच फिजिकल डिस्टन्स राखला जात नाही. अनेक ठिकाणी नागरिक एकत्र येऊन चौकात, पारावर, चावडीवर गप्पा मारत आहेत. चहा, हॉटेल्स, पानटपऱ्या नावाला बंद आहेत.
एवढेच काय मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली चारचौघे मिळून गप्पा मारण्याचा आनंद घेत आहेत. शहरी भागात पोलिसांच्या भीतीने तेथील नागरिक घराबाहेर पडत नसले तरी ग्रामीण भागात मात्र या उलट स्थिती पहावयास मिळत आहे. गावोगावी राजकीय हेतुने कारवाया होताना दिसत नाहीत.
ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, आशा स्वयंसेविका, सरपंच, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील यांचा समावेश आहे. मात्र ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक हे शहरातून ये - जा करतात. नियमित ते मुख्यालयी हजर नसतात. सध्या हे सर्वजण गावात राहणे आवश्यक असताना ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
स्थानिकांनी प्रशासनास सहकार्य करावे...
प्रशासनाकडे कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे एका कर्मचा-याकडे दोन गावांचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे स्थानिकांनी कोरोना नियमावलींचे पालन होत नसेल तर आमच्या निदर्शनास आणावे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.
अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काम व्हावे...
ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यामागील हेतू साध्य होत नसेल तर या समित्यांचा काहीच उपयोग नाही. राजकारणाच्या हेतूने अनेक ठिकाणी या समित्यांमार्फत कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या समित्यांचे शासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काम झाले तरच शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन होईल.
- रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते चापोली.
ग्रामीण भागातही कडक नियम करावेत...
शहरामध्ये कोरोना नियमावलींचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल.
- काशिनाथ लातुरे, चापोली.