लातूर : शहरातील औसा राेडवर असलेले शाेरुम चार ते पाच जणांच्या टाेळीने फाेडून, एका चारचाकी वाहनातून जवळपास २३ लाखांचे साहित्य चाेरुन नेले हाेते. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टाेळीतील एकाला टेम्पाेसह ताब्यात घेतले आहे. अन्य साथीदार पसार झाले आहेत. त्यांच्याही मागावर पाेलीस पथक आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील औसा राेडवर असलेल्या शांताई डिस्टीब्युटर्सचे एलजी शाेरुम फाेडून चाेरट्यांनी टेम्पाे भरुन साहित्य पळविले हाेते. हा गुन्हा चाेरट्यांनी भल्या पहाटे केल्याने एकच खळबळ उडाली हाेती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याचा समांतर तपास सुरु केला हाेता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थागुशाला यश आले असून, गुन्ह्यात वापरलेला टेम्पाे आणि एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हे शाेरुम फाेडणारी टाेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील असल्याची माहिती समाेर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकातील रामहरी भाेसले, पाेलीस हवालदार फड, पाेह. भाेंग, पाेह. डांगे, पाेह. हासबे, पाेलीस नाईक कानगुले, पाेलीस काॅन्स्टेबल शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खाडगाव चाैकाजवळ एक टेम्पाे थांबलेला आढळून आला.
या टेम्पाेतील तीन जण पळून गेले. तर एक जण पथकाच्या हाताला लागला. अधिक चाैकशी केल्यानंतर हे शाेरुम आपण फाेडल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यांच्याकडून टेम्पाेसह ६ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला शिवाजीनगर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.