लातूर : महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमूठ सैल होत आहे. आघाडीचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करता आले नाही. त्यांच्या हातून ४० आमदार निसटले, अशा माणसाच्या हाती महाराष्ट्राचे नेतृत्व दिले ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लक्षात आली आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत जाहीर भाष्य केले जात आहे, ते न्यायालयाचा अवमान केल्यासारखे आहे. निकाल केव्हाही लागू शकतो, त्याअगोदर भाष्य करणे चुकीचे आहे. ज्यांनी भाष्य केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आगामी काळामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) पुढच्या सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे. केंद्र व राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाचे घर चलो अभियान चालू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. आपण स्वत: डिसेंबर २०२३ अखेर राज्यातील २८८ मतदारसंघात जाणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. सुधाकर शृंगारे, माजी आ. गोविंद केंद्रे, गणेश हाके, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर आदींची उपस्थिती होती.
लोकसभेच्या ४८ अन् विधानसभेच्या २०० च्या वर जिंकूमहाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या दोनशेच्यावर जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर करून राबविले आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने घर चलो अभियान सुरू केले आहे. त्यामुळे आम्हाला यश मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला स्थानकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पक्षावर लढल्या जात नाहीत, लातूर जिल्ह्यामध्ये कसलीही गटबाजी नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये लातूरला निश्चित स्थान मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.