चाकूर (लातूर ) : इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे इंधन दरवाढ कमी करावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज तहसील कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जुने बसस्थानक येथे निदर्शने करत इंधन दरवाढ कमी करावी, मूग, उडीद, सोयाबीन व तूर यांची हमीभावाने खरेदी करावी, मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात यावे. लातूर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करावी, चाकूर येथे ट्रामा केअर सेंन्टरचे काम सुरू करण्यात यावे, मुलामुलींचे शासकीय वसतिगृह बांधण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. यानंतर आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना दिले.
तसेच आंदोलकांनी पेट्रोल पंपावर वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन शासनाचा निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य हरिश काळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, नगरसेवक इलियास सय्यद, शिवप्रकाश शेटे, माहिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनुसया भालेकर, शिवाजीराव काळे, गणेश फुलारी, सिध्देश्वर अंकलकोटे, सुरज शेटे, सोमनाथ सामी, अॅङ् युवराज पाटील, शरद जाधव, चंद्रकांत मारापल्ले, संदीप शेटे, यशवंत पाटील,राम फुले, सुभाष घोडके आदींचा सहभाग होता.