लातूर: नीट गुणवाढसंदर्भात लातुरातील दाेघा शिक्षकांच्या अटकनंतर केलेल्या चाैकशीत नवनवीन खुलासे समाेर येत आहेत. यातील प्रमुख सूत्रधार हा इरण्णा काेनगलवार आणि दिल्लीत ठाण मांडून बसलेला गंगाधर हाच असल्याची खात्री आता पाेलिसांची झाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासूनच इरणा व गंगाधरचा माेबाईल नाॅटरिचेबल आहे. त्यांच्या अटकेनंतरच धक्कादायक खुलासे समाेर येतील, असे सूत्रांनी सांगितले. नीट प्रकरणाचा तपास आता पाच समांतर यंत्रणाच्या माध्यमातून केला जात असून, लातूर येथील विविध पथके इरण्णा, गंगाधारच्या मागवार आहेत.
दिल्लीतील गंगाधर अन् उत्तराखंडचे कनेक्शन काय?
लातूर येथील पाेलिस पथक उत्तराखंड, दिल्लीतील गंगाधरचे काही कनेक्शन आहे का? याचाही तपास करणार आहेत. त्याअनुषंगाने मंगळवारी हे पथक उत्तराखंडमध्ये धडकल्याची माहिती आता समाेर आली आहे. गुजरात, दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तराखंड आणि महाराष्ट्र असा काही संबंध आहे का? त्याचे धागेदाेरे कुठपर्यंत आहेत, हा तपशील चाैकशीतून समाेर येईल.
चार पालक बीड; एक लातुरातील...
नीट परीक्षेत गुणवाढ करण्यासाठी पैशाची देवाण-घेवाण करणाऱ्यात बीड जिल्ह्यातील चार आणि लातूर जिल्ह्यातील एका पालकाचा समावेश असल्याची माहिती चाैकशीतून समाेर आली आहे. त्यांची चाैकशी करुन, जबाब नाेंदवून घेण्यात आले आहेत. तर उर्वरित पालकांना आता टप्प्या-टप्प्याने चाैकशीला पाचारण केले जाणार आहे.
एप्रिल-जून महिन्यात झाली आर्थिक उलाढाल...
नीट गुणवाढीसंदर्भात लातुरात इरण्णा काेनगलवार याची पहिली भेट एप्रिल महिन्यात झाल्याचे चाैकशीत संजय जाधवने सांगितले आहे. एप्रिल-मे आणि जून या तीन महिन्यातील हा प्रकार असल्याचे समाेर आले आहे. याच काळात गुणवाढीसाठी काही जणांकडून पैसे घेतल्याचे आराेपींनी सांगितले आहे. ४ जूनच्या नीट निकालानंतर मात्र काहींचे काम न झाल्याने पैसे परत केल्याची कबुली आराेपींनी दिली आहे.