संदीप शिंदेलातूर :शिक्षण संचालनालयाच्या सुचनेनुसार शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळांकडून पोषण आहारासाठी मागविण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात १ लाख ३०५ विद्यार्थ्यांनी अद्यापही आधार कार्ड दिलेले नाही. त्यातच जिल्ह्यात आधार कार्ड काढण्यासाठी केवळ ५५ मशीन असून, त्यावर एक दिवसात केवळ ४० जणांचे आधार कार्ड काढता येते. परिणामी, अपुऱ्या मशिनमुळे पालक, विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
शालेय पोषण आहारासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळेशी जोडणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना सूचना करण्यात आल्या असून, शिक्षकही पालकांकडे मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी तगादा लावत आहे. मात्र, तालुक्याच्या ठिकाणी केवळ एक ते दोन आधार केंद्र आहेत. तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अर्जात वारंवार त्रुटी काढल्या जात असल्याने पालकांची हेळसांड होत आहे.
जिल्ह्यात ४ लाख ८४ हजार ६५८ विद्यार्थी असून, यापैकी ३ लाख ८४ हजार ३५३ जणांनी शाळेत आधार जमा केले आहे. तर १ लाख ३०५ विद्यार्थ्यांनी अद्यापही आधार दिलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने ज्या प्रमाणे आधार कार्ड जमा करण्यासाठी सक्ती केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळा किंवा केंद्रस्तरावर आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, शिक्षकांमधूप होत आहे.
पाच दिवसांपासून आधारसाठी धावपळ...मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी पाच दिवसांपासून औसा येथे येत आहे. मात्र, अर्जात त्रुटी सांगण्यात येत असून, पुढील महिन्यात बोलावले आहे. शेतीची कामे सोडून आधारासाठी यावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. शाळास्तरावर सुविधा उपलब्ध करून द्यावी. - बालाजी कंगले, पालक
शाळास्तरावर सुविधा उपलब्ध करावी...प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकच मशीन आहे. ग्रामीण भागातून आधार काढण्यासाठी पालकांना तीन ते चार दिवस लागत असल्यामुळे पालकांची विद्यार्थ्यांची व शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. - महादेव खिचडे, तालुकाध्यक्ष, शिक्षक संघ
जिल्ह्यात केवळ ५५ आधार केंद्र...जिल्ह्यात ५५ ठिकाणी आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना गावावरुन तालुक्याला चकरा माराव्या लागत आहे. विशेष म्हणजे या आधार केंद्रावर जुनाच सेटअप असल्याने एका दिवसात केवळ ४० जणांचे आधार कार्ड काढता येते. परिणामी, पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
आधार कार्डासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन...शाळांनी ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक मिळविणे आवश्यक आहे. १ जानेवारीपासून ज्या विद्यार्थ्यांचे आधार नाही. त्यांना पोषण आहारापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे आधारसाठी शिक्षकांसह पालकांचीही धावपळ सुरु असल्याचे चित्र आहे.