लातूर : पाणी सर्वांचीच समस्या आहे़ ती सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे़ दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे़ त्यासाठी नळाला मीटर बसविणे, सांडपाण्याचा पुनर्वापर यावर भर देणे आवश्यक आहे, असा सूर लातुरातील पाणीपरिषदेत निघाला़जिल्हा प्रशासन व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे आयोजित दोन दिवसीय पाणी परिषदेचे उद्घाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते झाले़ यावेळी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, मनपा आयुक्त एम़डी़सिंह, जि़प़चे सीईओ डॉ़ विपीन ईटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ पाणी बचतीसाठी केलेल्या नियोजनाचा फायदा आपल्या भावी पिढीला व्हावा़ लातूर शहरात काही रूग्णालय व शाळा, महाविद्यालयात सांडपाण्याचा पुनर्वापर सुरू आहे़ही अभिमानाची बाब आहे़ देशात एकाही शहरात पाणीधोरण नाही़ लातूर शहर हे पहिले शहर असेल जे पाणीधोरण राबविणार आहे़ यासाठी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, मनपा आयुक्त एम़डी़सिंह हे प्रयत्नशील असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यावेळी म्हणाले़
पाणी बचतीसाठी सुक्ष्म नियोजन गरजेचे, पाणी परिषदेतील सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:59 AM