लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलीटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीसंदर्भात दाखल गुन्ह्यात सीबीआय पथकाने आंध्र प्रदेशातून दाेन दिवसांपूर्वी अटक केलेल्या गंगाधारला बंगळुरू येथून साेमवारी रात्री उशिरा लातुरात आणले. त्याला मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दाेन दिवसांची सीबीआय काेठडी सुनावली आहे.
‘नीट’मध्ये गुणवाढीच्या संदर्भाने लातुरात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात २३ जून राेजी नांदेड एटीएसच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्ह्याचा प्राथमिक तपास लातूर येथील पाेलिसांनी केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग झाले. गेल्या आठ दिवसांपासून लातूर शहरात सीबीआय पथक मुक्कामी आहे. ‘नीट’मध्ये गुण वाढवून देताे, असे आमिष दाखवून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या एकाला सीबीआयने पुरावे मिळाल्यानंतर साेमवारी रात्री अटक केली. सीबीआयच्या रेकाॅर्डवर आता एन. गंगाधरअप्पा नंजुनाथप्पा जी. असे तिसऱ्या आराेपीचे नाव नाेंदविण्यात आल्याचे मंगळवारी समाेर आले.
काही वेळात मिळाला सरकारी वकील...
लातूर न्यायालयात सीबीआयने गंगाधरला मंगळवारी हजर केले. यावेळी न्यायालयाने विचारणा केली. तुमचा वकील काेण आहे? यावर गंगाधार म्हणाला, माझा वकील नाही. येथे तुमची काेणाशी ओळख आहे का? त्यावर ताे म्हणाला, येथे माझी काेणाशीही ओळख नाही. यावर न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने सहायक लाेकअभिरक्षक (बचावर पक्ष) एफ.पी. सय्यद हे वकील म्हणून देण्यात आले. सीबीआय काेठडीची गरज नसल्याची बाजू त्यांनी मांडली.
सीबीआयने केली काेठडीची मागणी...
गंगाधरशी माेबाइलवर संपर्क झाला असून, अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे व्हाट्सॲपवर प्राप्त झाली आहेत. शिवाय, दाेघा शिक्षकांसाेबत काही आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले. यासाठी दाेन दिवस सीबीआय काेठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने ॲड. मंगेश महिंद्रकर यांनी केला.